शेगाव तालुक्यातील ग्रामीण महावितरणच्या निष्काळजी, भोंगळ आणि गैरजबाबदार कारभारामुळे अखेर जनतेचा व शिवसेनेचा संताप उसळला आहे. नागरिकांना आणि शेतकऱ्यांना होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शिवसेना तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.
रीडिंग न घेता अवाजवी वीजबिले पाठवणे, मिटरचे कोटेशन भरूनही मिटर न देणे, गावांमधील स्ट्रीट लाईट दिवसा सुरू ठेवून रात्री बंद ठेवणे, तसेच शेतातील पंपांना वारंवार येणाऱ्या विजेच्या अडचणींमुळे मोटार जळून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान — या सर्व समस्यांकडे महावितरण अधिकारी पूर्णपणे उदासीन आहेत, असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
याचबरोबर, योग्य देखभाल न झाल्याने काही ठिकाणी तुटलेल्या लाईनमुळे शॉक लागून मृत्यू झाल्याचीही दुर्दैवी प्रकरणे घडली, तरीसुद्धा संबंधित ठिकाणांची दुरुस्ती आजवर करण्यात आलेली नाही, असेही निदर्शनास आणून देण्यात आले.
शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना प्रचंड त्रास होत असतानाही कनिष्ठ अभियंता श्री. चवरे वारंवार तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात आले. शेगाव ग्रामीण विभागात दोन कनिष्ठ अभियंते असूनही अनेक गावांचे काम ठप्प आहे, हे महावितरणच्या अकार्यक्षमतेचे ज्वलंत उदाहरण असल्याचे शिवसेनेचे मत आहे.
ही बातमी वाचा – पाडळीचे वैभव- वैभव भुतेकर एमपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा
निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिवसेना शिष्टमंडळास कार्यालयात अधिकारी अनुपस्थित आढळले. निषेध म्हणून अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून शिवसैनिकांनी संतप्त रोष व्यक्त केला. “महावितरण ठेकेदारीत गेलंय म्हणून जबाबदारी टाळणं आम्ही सहन करणार नाही, जनतेचा संयम आता संपला आहे!” अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून टाकला.
शिवसेना तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी स्पष्ट इशारा दिला —
“वरिष्ठ अभियंता मोहता साहेबांनी या सर्व समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांचा छळ तात्काळ थांबवावा. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, रस्ता रोको, ठिय्या आंदोलन आणि धडक मोर्चा काढण्यात येईल. त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनावर राहील.”
या तडाखेबंद आंदोलनावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू पाटील मिरगे, तालुका प्रमुख रामा पाटील थारकर, संतोष घाटोळ, पवन बारिंगे, मोहन लांजुळकर, भूषण भांबेरे, प्रफुल डोंगरे, विजय विभुते, ज्ञानेश्वर डांगे, ज्ञानेश्वर दळी, मंगेश गायकी, भागवत उन्हाळे, राजेश रहाटे, तुषार वानखेडे, राहुल हिवराळे, मंगेश हिवराळे, प्रज्वल जवरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा
लोकहित आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी चाललेला हा लढा महावितरण प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराला दिलेले ठोस प्रत्युत्तर असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
“कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल — आणि मग जबाबदारी महावितरणचीच!” अशा शब्दांत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला
