विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा! शिवसेनेचा प्रशासनावर संताप

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

दोन दिवसांत बस नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा

 

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाकडे सातत्याने होत असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आज शिवसेना तालुकाप्रमुख श्री. रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त आंदोलनात्मक भूमिका घेत शेगाव बस स्थानक आगार प्रमुखांकडे तीव्र शब्दांत तक्रार नोंदविण्यात आली.

नवीन सवर्णा–चिंचोली मार्गावर अपुऱ्या एस.टी. बससेवेमुळे विद्यार्थी अक्षरशः तासन्तास ताटकळत असून, गर्दी, धक्काबुक्की व अपघाताचा धोका वाढला आहे. ही बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललेला उघड खेळ असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला.

 

राज्य परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसारख्या अत्यावश्यक सेवेबाबत दाखवली जाणारी बेफिकिरी ही घटनात्मक जबाबदारीचे सरळ उल्लंघन असून, एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
यावेळी नवीन सवर्णा–चिंचोली मार्गावर तातडीने अतिरिक्त एस.टी. बस सुरू करावी, अशी ठाम आणि लेखी मागणी करण्यात आली.

 

आगार प्रशासनाने या तीव्र दबावानंतर पुढील दोन दिवसांचा कालावधी मागत नवीन बस सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र, दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास एस.टी. आगारासमोर तीव्र आंदोलन, रास्तारोको व लोकशाही मार्गाने संघर्ष छेडला जाईल, असा इशारा शिवसेनेने दिला.

 

ही बातमी वाचा –  जिवंत आईच्या नावाचा मृत्यु दाखला, केलेली लाखोची फसवणुक

 

दरम्यान, परिसरात वाढलेल्या चिडीमारी व असामाजिक प्रकारांबाबत शिवसेनेने गंभीर दखल घेत स्थानिक पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांना तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर घाला घालणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई न झाल्यास पोलीस प्रशासनालाही जबाबदार धरले जाईल, असा इशारा देण्यात आला.

 

यावेळी उपसरपंच गौतम इंगळे, शिवसेना विभागप्रमुख महेश पहूरकार, तुकाराम गायगोळ, दीपक गीते, गोपाळ ढगे, रामदास ढगे, श्रीकृष्ण चव्हाण, प्रवीण चव्हाण, विठ्ठल उगले तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास हा मागणी नसून हक्क आहे, आणि तो हक्क मिळेपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.

Scroll to Top