संतनगरीत प्रथमच साकारला गणेश मंडळाने वातानुकुलित मंडप
या मंडळच्या वतीने गणेश उत्सवाची परंपरा शेगांव शहरातील प्रतिष्ठीत नागरिक स्व. शेखर नागपाल यांच्या संकल्पनेतुन प्रारंभ करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात ही या परिसरातील त्यांच्या चाहत्यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी क्लबचा गणेश उत्सव सोहळा हा दरवर्षी नाविन्यपुर्ण संकल्पनेतुन साकारण्यात येत असतो. त्याची तयारी सुध्दा जय्यत असतेे आणि दरवर्षी विविध आकर्षक देखाव्यांच्या माध्यमातुन शेगांवकरांना उत्सुकता कायम ठेवण्याचे काम या मंडळाच्या वतीने होत असते.
यावर्षी शेगाव नगरीत प्रथमच वातानुकूलित मंडप – शिवनेरी चौकातील श्री छत्रपती शिवाजी क्लबचा अद्वितीय देखावा
शेगाव (प्रतिनिधी) :
शेगाव शहरात यंदा गणेशोत्सवात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. श्री छत्रपती शिवाजी क्लब, शिवनेरी चौक यांनी शहरात पहिल्यांदाच एअर कंडिशनर मंडप उभारून भाविकांसाठी एक आगळावेगळा देखावा साकारला आहे.
मंडपाचे संपूर्ण स्वरूप गुफेसारखे तयार केले असून त्यात वाहत्या पाण्याचे झरे, थंडावा देणारी वातानुकूलित व्यवस्था यामुळे भक्तांना अद्वितीय अनुभव मिळत आहे. या गुफेत साकारण्यात आलेली झांकी पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करत आहे.
देखाव्यामध्ये श्री गणपती बाप्पा हे परंपूजनीय भगवान शंकरांच्या आराधनेत मग्न असल्याचे दर्शन घडते. बाप्पांची ही अप्रतिम मूर्ती शेगाव येथील दसरानगरमधील श्री शाम बाप्पा देशमुख यांनी साकारली आहे. या मूर्तीतील भावभावना इतक्या जिवंत वाटतात की जणू बाप्पा साक्षात आराधनेत लीन झाले आहेत.
ही बातमी वाचा –गौरी गणपतींचे विसर्जन, भांडुप कृत्रिम तलावात हजारो गणेश मुर्तींचे विसर्जन
गणपती बाप्पाच्या समोर शंकराचे मंदिर उभारले असून, मंडपाचा हा देखावा मंडळातील सर्व सदस्यांनी मिळून साकारला आहे.
या मंडळाची स्थापना स्व. शेखर भाऊ नागपाल यांनी केली होती, जे शेगाव गणेशोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यामुळे हे शिवाजी क्लब गणेशोत्सव मंडळ हे शेगावचे मानाचे गणपती मानले जाते. शेखर भाऊंच्या निधनानंतर शिवनेरी चौक तसेच मंडळातील सर्व सदस्य या परंपरेला अधिक जोपासत असून, दरवर्षी मंडपाला अधिक भव्य व आकर्षक स्वरूप देत आहेत.
या अभिनव उपक्रमामुळे शिवनेरी चौकातील श्री छत्रपती शिवाजी क्लबचा मंडप हे शहरातील आकर्षणाचे व चर्चेचे ठिकाण ठरले आहे.
