वडेट्टीवार-धानोरकर वादात हातची सत्ता गेली; चंद्रपूर काँग्रेसचा अहवाल आता दिल्लीत.

चंद्रपूर

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

:सत्ता हा राजकारणाचा केंद्रबिंदू असला तरी, नेत्यांच्या नेतृत्वाच्या हव्यासापोटी हातात आलेली सत्ता कशी गमावली जाते, याचा जिवंत नमुना चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालातून समोर आला आहे. चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला असतानाही, केवळ अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले असून, याचा थेट फायदा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने घेतला आहे.

नेत्यांची जुंपली, महायुती सरसावली
मिळालेल्या माहितीनुसार, अत्यल्प सहकाऱ्यांच्या मदतीने काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची मोठी संधी होती. मात्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अस्तित्वाचा वाद विकोपाला पोहोचला. दोन्ही नेत्यांनी आपापले नगरसेवक स्वतंत्रपणे दिल्ली आणि मुंबईला नेल्याने पक्षात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या समन्वयाचा अभाव पाहून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने ऐनवेळी भाजपला साथ दिली आणि भाजपच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी अवघ्या एका मताने वर्णी लागली.

गटबाजीमुळे काँग्रेसचा र्‍हास?
२०१४ पासून सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला यंदा जनतेने पुन्हा मोठी संधी दिली होती. मात्र, स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्याऐवजी नेत्यांमधील ‘अरेरावी’ आणि गटबाजीमुळे पक्ष संपुष्टात येऊ लागल्याचे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे. हा वाद दिल्ली दरबारात पोहोचला तरी, निर्णय होईपर्यंत वेळ निघून गेली होती.

सुनील केदार यांचा अहवाल दिल्लीला
चंद्रपुरात बहुमत असतानाही सत्ता काबीज का करता आली नाही, याचा सविस्तर अहवाल पक्ष निरीक्षक सुनील केदार यांनी तयार केला आहे. हा अहवाल आता दिल्ली दरबारात काँग्रेस हायकमांडला पाठवण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या अहवालात दोन्ही गटांच्या भूमिकेवर आणि पराभवाच्या कारणांवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे.

हे पण वाचा…आपुलकी फुडस्,शेगांव- वाटचाल 7 व्या वर्षाकडे

 

महायुतीची चाणाक्य नीती
दुसरीकडे, २०१४ पासून सत्ता टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने जी रणनीती आखली, ती वाखणण्याजोगी ठरली आहे. मित्रपक्षांना सोबत घेत आणि काँग्रेसमधील फुटीचा फायदा उठवत महायुतीने चंद्रपुरात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Scroll to Top