मराठी शाळा टिकविणे कठीण झाले आहे. – गटशिक्षणाधिकारी संजय सुरडकर 

दि. १० ऑगस्ट २०२५, शेगांव.

         शालेय जीवन हे माणसाच्या आयुष्यातील अतिशय अमूल्य काळ असून शालेय जीवन अविस्मरणीय असते. ते कधी विसरता येत नाही. शाळा ही व्यक्तिमत्व विकास घडविणारी कार्यशाळा असते. आज मराठी शाळेची दयनिय अवस्था होत आहे. अशा धकाधकीच्या कॉन्व्हेंट काळात मराठी शाळा टिकविणे अतिशय कठीण झाले आहे. अशा विपरीत परिस्थितीतही बुरुंगले विद्यालयाची पटसंख्या दिवसागणिक वाढत आहे. ही  कै. ज्ञानेश्वर उपाख्य भाऊसाहेब बुरूंगले यांनी स्थापन केलेल्या विद्यालयासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. असे गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी संजय सुरडकर यांनी श्री. मस्कुजी बिरुजी बुरुंगले विद्यालयाच्या ४२ व्या वर्धापनदिनी प्रमुख अतिथी म्हणून व्यक्त केले.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शेगावचे  निरीक्षण अधिकारी एस. सी. बावणे यांनी आपल्या शालेय जीवनाला उजाळा दिला. शिक्षकांनी मला नीट वाट दाखवली नसती, तर मी अधिकारी झालो नसतो.  बुरूंगले विद्यालयाने माझ्या जीवनाला  नवे वळण देऊन मला घडविले, याचा मला सार्थ अभिमान आहे. असे भावोद्गार व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी संतांनी दिलेली शिकवण आत्मसात करून शिक्षण घ्यावे आणि स्पर्धा परीक्षेची कास धरून जीवनात यशस्वी व्हावे, असा संदेश पुरवठा निरीक्षक के. टी. केणे यांनी दिला.   विद्यालय हे माणूस घडविण्याचे केंद्र आहे. असे विचार बी. व्ही. गिरी सर यांनी आपल्या अनुभवातून सांगितले.
वर्धापन दिन हा संस्थेच्या विकासाचा आरसा आहे. हे विद्यालय म्हणजे ४२ वर्षांपूर्वी कै. भाऊसाहेब बुरूंगले यांनी शैक्षणिक, सामाजिक जाणवेतून स्थापन केलेल्या दूरदृष्टीपणाचे हे फलित आहे. विद्यमान अध्यक्ष रामविजय उपाख्य बापूसाहेब बुरूंगले यांच्या नेतृत्वात हे विद्यालय गगनभरारी घेत आहे. माणूस घडविणे हेच या संस्थेचे मुख्य ध्येय आहे.   असे अध्यक्षीय चिंतन प्राचार्या मीनाक्षीताई बुरूंगले यांनी मांडले.
        वर्धापनदिनाचे औचित्यसाधून लोकमत समूहाने Womans Achievers Award 2025 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हा पुरस्कार  कर्तव्यदक्ष, मातृहृदयी  प्राचार्या मीनाक्षीताई बुरूंगले यांना देऊन सन्मानित केल्याबद्दल सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी दहावी बारावीत प्राविण्य प्राप्त विद्यार्थी जानवी गजानन चोपडे, सक्षम एकनाथ राजवैद्य, प्रणाली संतोष शेगोकार, प्रांजली बळीराम अरज,  नेहा गजानन गोसावी, सुजाता गजानन सावळे, राधा जुगलकिशोर राठी, सोहम हितल जैन, प्रेक्षा राहुल पालडीवार,  रोहित गोपाल पल्हाडे, रोहित दीपक झंवर, रिया पंकज अग्रवाल, प्रणव कैलास नागलकर, गुंजन अनिल थेटे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी ज्ञानेश्वर घुले, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ई. खडसान, विद्यालयाचे पर्यवेक्षक शिवाजी निळे प्रामुख्याने उपस्थित होते.  नेहा राहाटे, अर्पिता मोरे, मुक्ता थारकर या विद्यार्थिनींनी प्रसंगोचित मनोगत व्यक्त केले. या देखण्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय मांडवे यांनी केले.  सूत्रसंचालन श्रीमती कोकाटे मॅडम यांनी केले. तर आभार प्रा. पवन पाटील यांनी मानले. शेवटी मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment