ज्या माणसाने बिड्या फुंकल्या, मांसाहार केला, बालपणी खोटा बोलला, चोरी केली, आत्महत्येचा प्रयत्न केला, नाचगाणी केली, वेश्यालयातही गेला . . .तो आपला राष्ट्रपिता कसा झाला ? का जगातल्या प्रत्येक देशात त्याचे पुतळे उभारले गेले ? महात्मा कसा झाला ?
अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग, आफ्रिकेत नेल्सन मंडेला, म्यानमार मध्ये आंग सान सू की, पाकिस्तानातील मलाला युसुफजाई यांचे प्रेरणास्थान कसे बनला ?
एकच कारण “आतला आवाज !” . . . .
The Inner voice ! . . . . .
गांधीजी कोणाला काय वाटेल याची पर्वा न करता आपल्या आत्मचरित्रात लिहितात, बालपणी त्यांच्या एका मित्राच्या नादाने त्यांना बिड्या फुंकण्याची सवय लागली. या मित्रासोबत त्यांनी लपून छपून मांसाहारही केला. बिड्या विकत घेणे शक्य नव्हते म्हणून इतरांनी अर्धवट फुंकलेल्या बिड्या फुंकण्यास सुरुवात केली, नंतर त्यांनी बिड्या विकत घेण्यासाठी उधारी केली. शेवटी उधार देणारा उधारी मागण्यासाठी घरापर्यंत येऊ नये म्हणून हातातील सोन्याच्या कड्याचा तुकडा कापून विकला ! म्हणजेच चोरीच !
धोत्र्याच्या विषारी बिया खाऊन आत्महत्येचाही प्रयत्न करायचे ठरवले. हिंमत झाली नाही !
बालमोहनदासाच्या आयुष्यात प्रथमच “आतला आवाज” प्रकट झाला ! आवाज म्हणाला मोहन तू चुकतो आहेस !
किती काळ फसवशील स्वतःला ?
सत्यप्रिय मोहन ने आपल्या आतल्या आवाजाला “ओ” दिला ! या आतल्या आवाजाचे म्हणणे ऐकण्याचे ठरविले ! तरी बाह्य मन तयार होत नव्हते शेवटी त्याने केलेल्या सर्व चुका एका कागदावर लिहिल्या. आणि तो कागद वडिलांच्या उशी जवळ ठेवला . . .
पश्चातापात त्याच्या मनातील मळभ दूर झाले !
बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंड मध्ये गेल्यावर गांधींचे फारसे मित्र बनत नव्हते. त्यांचा वेश सुद्धा गुजराती कपडे डोक्यावर काठीयावाडी पगडी असा होता. चांगले इंग्रजी सुद्धा येत नव्हते. कोणीतरी सांगितले, “be Roman when you are in Rome” या उक्तीनुसार तू जर इंग्रजांप्रमाणे राहिलास तर इंग्रज तुला आपलेसे करून घेतील.
ही बातमी वाचा –राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या 230 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
पैशांची कमतरता नव्हतीच. मोहन ने त्याकाळी असलेल्या सगळ्यात महागड्या कपड्यांचा सूट, टाय, बूट खरेदी केले. पण नुसते “जैसा देश वैसा भेस” करून काय होणार ? इंग्रजांसारखे वागता आले पाहिजे म्हणून त्यांनी वक्तृत्वाचा क्लास लावला, बॉल डान्स शिकणे सुरू केले, व्हायोलिनचा पण क्लास लावला. बरेच काही केले . . .
पण समाधान झाले नाही !
मोहनदास च्या आयुष्यात दुसऱ्यांदा “आतला आवाज” प्रगट झाला !
आवाज म्हणाला,”मोहनदास तू इंग्लंडला कशासाठी आला आहेस ?”
मोहनदास म्हणाला,”बॅरिस्टर होण्यासाठी !”
आपला आवाज म्हणाला,”बॅरिस्टर होण्यासाठी आला आहेस तर अभ्यास कर !” हा काय फालतूपणा लावला आहेस सूट कोट, नाच गाणी केल्याने तू बॅरिस्टर होणार आहेस का ?
आतल्या आवाजाने मोहनदास चे डोळे खाडकन उघडले !
त्याने या ही वेळी आतल्या आवाजाला “ओ” दिला !
गांधीजी आपल्या आत्मचरित्रात लिहितात आणि त्या दिवसापासून माझे वर्तन बदलले !
गांधीजींचे सर्व जीवन या आतल्या आवाजाला “ओ” देण्यात गेले ! म्हणून ते महात्मा झाले !
आतला आवाज तुम्हा आम्हा सर्वांजवळ असतोच !
तोच आमचा सच्चा मित्र आणि मार्गदर्शक असतो. हा आतला आवाज आमच्याशी कधीच खोटे बोलत नाही !
आमची समस्या आहे की आम्ही आमच्या “आतल्या आवाजा”चे म्हणणे कधीच ऐकत नाही !
उलट अहंकाराने आतल्या आवाजाला कुतर्कानें दाबण्याचा प्रयत्न करतो !
हा आपला “आतला आवाज” inner voice म्हणजेच “सत्य” असते काय ?
– पुन्हा कधीतरी !
– सौ. नंदा उदापूरकर,
श्री अ खि नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,खामगाव
