बंद पडलेल्या ज्वारी खरेदी संदर्भात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वात दिले होते निवेदन ..
मुंबई : रब्बी हंगाम २०२४-२५ मधील ज्वारी खरेदीची अंतिम मुदत वाढविण्याबाबत शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागण्या अखेर फलद्रूप ठरल्या आहेत. खुल्या बाजारातील दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात ज्वारी विकावी लागत होती. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाकडे मुदतवाढीची मागणी होत होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करून राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार केंद्र शासनाने मंजुरी देत ज्वारी खरेदीची मुदत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
या निर्णयासाठी स्थानिक स्तरावर झालेल्या पाठपुराव्याला विशेष महत्त्व आहे. शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांचे निवेदन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे पोहोचविण्यात आले. या निवेदनावेळी देवमन पाटील, पुरूषोत्तम पाटील, चंदु पाटील, मंगेश भांगे, उमेश ढगे, ऋषीकेश कोकाटे, विकास ढगे, भुषन ढगे, निवृती घाटे, महेश पाटील, देविदास लांजुलकार, राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या सामूहिक प्रयत्नांना अखेर यश लाभले असून शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे.
ही बातमी वाचा –खाली मांडी घालून जेवण्याचे असंख्य फायदे
केंद्र शासनाने दिलेली मुदतवाढ ही शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय ठरला असून, शासन निर्णयातील सर्व तरतुदी व केंद्र शासनाच्या अटींचे काटेकोर पालन करून खरेदी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. शेतकऱ्यांचा संघर्ष व्यर्थ जात नाही, ही मुदतवाढ त्याचीच ठोस साक्ष आहे.