शेगांव- दि.22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैल पोळा सणाकरीता बाजारात जरी आजस्थितीला गर्दी असली तरी बैलपोळा साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी एका पत्राव्दारे कळविले आहे.
विदर्भामध्ये संपन्न होणारा श्रावणी पोळा महत्वपुर्ण सण असला तरी या सणाला जनावरांच्या लम्पी रोगाच्या वाढत्या संख्येमुळे प्रतिबंध करण्याकरीता जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हयात लम्पी रोगाचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणण्याकरीता बैल पोळा सण हा साध्या पध्दतीने साजरा करावा असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहे.
ही बातमी वाचा- मराठीचा मुद्दा भरकटवल्या जात आहे!
जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये लंपी रोगाचा वाढता प्रदुभाव वाढला आहे. त्यामुळे प्राण्यातील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार जिल्हयात अधिसूचना जारी करण्यात आली असून रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व विभागांना प्रतिबंधक खबरदारी घेण्याचें आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवार दि. 22 ऑगस्ट रोजी बैलपोळा सण साजरा होणार आहे.
ही बातमी वाचा- बैल पोळा सणाकरीता सजली बाजारपेठ, महागाई सावट
या दिवशी बैल एकत्र करुन सण साजरा केल्यास किंवा शर्यतीचे आवाहन झाल्यास लम्पी रोगांचा प्रादुभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभुमीवर सर्व पशुपालकांनी साध्या पध्दतीने सण साजरा करण्यासाठी दक्षता घ्यावी. अशा सुचना सर्व संबधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
तसेच हा अनूसुचित रोग असल्यामुळे प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शासकीय, निमशासकीय वा स्थानिक स्वराज्य संस्थाकडून कार्यवाहीत दिरंगाई किंवा अडथळा आढळल्यास प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 मधील कलम 31,32 व 33 अन्वये दंडात्मक कारवाइृ करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. याची सर्व संबधित विभागांनी तसेच पशुपालकांनी गंभीर दखल घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
