नांदेड (प्रतिनिधी) : बुद्ध बसवण्णा रविदास शिव फुले शाहू पेरियार अहिल्या आंबेडकर अण्णाभाऊ गाडगेबाबा कांशीराम हेच आमचे खरे नायक आहेत तसेच खलनायक कोण हे देखिल ओळखावे असे प्रतिपादन ओबीसी नेते प्रा. डाॅ. आर. डी. शिंदे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकर नगर सिडको नवीन नांदेड येथे पेरियार रामास्वामी नायकर, विरांगणा भीमाबाई होळकर, राजे उमाजी नाईक, प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांची जयंती तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून सत्कार व वाचक मेळावा आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात प्रा. शिंदे बोलत होते.
याप्रसंगी ओबीसी मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, ओबीसी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल इंजि. संजयकुमार अवस्थी, इंजि. कोंडीबा घनचेकर, इंजि. सतीशचंद्र शिंदे, बाबाराव जरगेवाड, माधव बामणे, कालवश भानुदास यादव (मरणोत्तर) यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या प्रभावी भाषणात प्रा. डाॅ. आर. डी. शिंदे पुढे म्हणाले की, ओबीसीच्या ताटातील सर्व हिरावून घेतले जात असताना ओबीसी अजून गाढ झोपेत आहे. वाचनाच्या अभावे ओबीसीत सांस्कृतिक मरगळ आली आहे. ग्रंथ हेच आपले गुरु आहेत. आपल्या महामानवांचे ग्रंथ वाचा. सध्याचे नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) म्हणजे मनुस्मृतीकडे वाटचाल आहे. याचा आम्ही विरोध केला पाहिजे. यासाठी सत्तेत आपली माणसे गेली पाहिजेत.
ही बातमी वाचा –पडळकरांच्या आक्रमक वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल
राम आणि कृष्ण यांनी नाही तर म. फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी आमच्यासाठी शाळा काढल्या आहेत. त्यामुळे राम आणि कृष्ण हे आमचे नायक कधीही होऊ शकत नाहीत. आमचे नायक कोण आणि खलनायक कोण हे आम्हाला कळले पाहिजे. आम्ही धर्म नसलेली माणसे व आमचा धर्म कोणता ? असा व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत मुक्ता साळवे या चिमुरडीत येते याचे कारण फुले दांपत्याचे शिक्षण हेच आहे म्हणून आम्ही शिकले पाहिजे असेही शेवटी प्रा. डाॅ. शिंदे म्हणाले.
कसल्याही सोयी सुविधा नसतांना इंजि. गोविंदराम शूरनर यांनी खेड्यापाड्यात आपल्यासोबत पायी फिरत केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी आपल्या भाषणातून यावेळी सत्काराला उत्तर देताना केला. पुन्हा एकदा ओबीसी व बहुजन समाजासाठी प्रबोधन शिबीरे घेण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी इंजि. लक्ष्मण लिंगापुरे, डाॅ. शंकर स्वामी, रामेश्वरगौड गोडसे, उत्तम सुरनर, मारोती चव्हाण यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन गोविंदराम शूरनर यांनी केले. पेरियार रामास्वामी नायकर यांची चरित्र पुस्तिका देऊन यावेळी वाचनालयाच्या वतीने सर्वांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रा. डाॅ. कैलाश यादव, सावित्रीबाई शूरनर, डी. एन. मोरे, तुप्पेकर महाजन, काॅ. दिगांबर घायाळे, मधुकर मुरगुलवाड, आनंद मुतनेवाड, गजानन जामकर, राजेंद्रकुमार तुडमे, दत्ता जोगदंड, एस. एन. गुंडाळे, ममता पतंगे, सविता हेलगिरे, वनिता राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Comments are closed.